नामदेव पायरीवर २१ हजार अर्ज अर्पण – शासनाला सद्बुद्धी मिळो, अशी सामूहिक प्रार्थना*

Admin
By -
0

 *पंढरपूरात ज्येष्ठ नागरिकांची ऐतिहासिक सन्मान दिंडी*

*नामदेव पायरीवर २१ हजार अर्ज अर्पण – शासनाला सद्बुद्धी मिळो, अशी सामूहिक प्रार्थना*

पंढरपूर, दि. ९ :

विठ्ठल-रुक्माईच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या पंढरपूर नगरीत आज हजारो ज्येष्ठ नागरिकांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. सन्मानधनाच्या मागणीसाठी काढलेल्या या मोर्चाला “सन्मान दिंडी” असे नाव देण्यात आले. भक्तिरसात न्हालेली ही दिंडी पाहण्यासाठी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने जमले होते


मोर्चापूर्वी जिजामाता उद्यानात आयोजित सभेत ज्येष्ठ नागरिक संघटनांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

सभेचे अध्यक्षस्थान शिवलाल जाधव (पुणे) यांनी भूषविले, तर घनश्याम दायमा व महादेव माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर गुरुलिंग कन्नूरकर (सोलापूर जिल्हा अध्यक्ष), जगन्नाथ मोरे पाटील (सांगली जिल्हा अध्यक्ष), चंद्रशेखर मोरे (सांगली जिल्हा कोषाध्यक्ष),adv. किरण पाटील (सल्लागार), भगवान नेवरीकर (सांगली जिल्हा सचिव), धोंडीराम खोत (सांगली जिल्हा उपाध्यक्ष), नवनाथ भाऊ पवार (माजी नगराध्यक्ष, सांगोला), वाघमोडे गुरुजी (सांगोला), नागनाथ आघट राव (पंढरपूर), मन्मथ कोनापुरे (सोलापूर जिल्हा सचिव) आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

घनश्याम दायमा यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर गुरुलिंग कन्नूरकर यांनी सन्मानधन वारीची उद्दिष्टे व रूपरेषा यावर प्रकाश टाकला.

सभेनंतर जिजामाता उद्यानातून “विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय हरी विठ्ठला, हरी ओम विठ्ठला” अशा गजरात सन्मान दिंडी नामदेव पायरीकडे प्रस्थान पावली. पारंपरिक ढोल-ताशे, टाळ-मृदंग यांच्या गजराने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले. तोंडात नामस्मरण, तर चेहऱ्यावर श्रद्धेचा भाव असे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले.

*नामदेव पायरीवर २१ हजार अर्ज अर्पण*


नामदेव पायरीवर पोहोचल्यावर जगन्नाथ मोरे पाटील,शिवलाल जाधव, घनश्याम दायमा, गुरुलिंग कन्नूरकर, मन्मथ कोनापुरे व किसन आरुटे डॉ. चन्नय्या स्वामी यांच्या उपस्थितीत मंत्रोच्चाराने २१,००० हून अधिक अर्ज अर्पण करण्यात आले.

या अर्जांतून शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी दरमहा रु.७००० सन्मानधन, मोफत आरोग्यसेवा, विशेष निवारा योजना, प्रवास सवलती आणि सामाजिक सुरक्षा हमी तातडीने मंजूर करावी, अशी मागणी केली.

सर्व उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी हात जोडून प्रार्थना केली –

“विठ्ठला, आमच्या मागण्या शासनाने ऐकाव्यात. आम्हाला उर्वरित आयुष्य सन्मानाने, समाधानाने आणि सुरक्षिततेने जगू दे.”

*५५०० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग*

या ऐतिहासिक दिंडीमध्ये ४००० पेक्षा अधिक पुरुष ज्येष्ठ व १५०० महिला ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले.यात सांगली, सोलापूर, सातारा, पुणे,लातूर, जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक 

 आदी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

*पंढरपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

पंढरपूरच्या रस्त्यांवरून निघालेली ही दिंडी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. महिलांनी दिंडीवर फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. “अभूतपूर्व दृश्य आहे, अशी दिंडी प्रथमच पाहत आहोत,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

शासनाच्या निर्णयाकडे लक्ष

ज्येष्ठ नागरिकांच्या या ऐतिहासिक दिंडीमुळे शासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून, सन्मानधनाच्या मागणीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पंढरपूरच्या या साक्षीने ज्येष्ठांचा आवाज केवळ मंदिरापुरता मर्यादित न राहता मंत्रालयापर्यंत पोहोचेल, असा ठाम विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)