करगणीतील तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न ; महसूल व पोलिसांच्या दक्षतेने टळला अनर्थ

Admin
By -
0

 आटपाडीतील थरारक घटना


करगणीतील तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न ; महसूल व पोलिसांच्या दक्षतेने टळला अनर्थ


आटपाडी : धार्मिक स्थळ (मंदिर) बंद करण्यात आल्याच्या मनस्तापातून करगणी येथील एका तरुणाने आज आटपाडी तहसील कार्यालयासमोर थरारक प्रकार घडवून आणला. धार्मिक श्रद्धा डावलल्याच्या संतापातून त्याने झाडावर चढून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र महसूल विभाग व पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.


सदर तरुणाने यापूर्वी तहसीलदारांना लेखी निवेदन देऊन मंदिर पुन्हा सुरु करण्याची मागणी केली होती. परंतु त्यावर काहीही हालचाल न झाल्याने आज तो थेट तहसील कार्यालयासमोरील झाडावर चढला. त्याने “उडी मारून आत्मदहन करीन” असा इशारा दिल्याने परिसरात मोठी धावपळ उडाली.


महसूल कर्मचारी व आटपाडी पोलिसांनी तातडीने धाव घेऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चाललेल्या समजावणुकीनंतर अखेर त्याला सुरक्षित खाली उतरवण्यात यश आले. त्यानंतर त्या तरुणाला तहसीलदार मॅडम यांच्यासमोर आणण्यात आले.


युवकाने आपली संपूर्ण व्यथा तहसीलदारांसमोर मांडली. “तू शांत राहा, प्रशासनाकडून तुला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल,” असे आश्वासन तहसीलदारांनी दिल्यानंतर अखेर युवक शांत झाला.


दरम्यान, संबंधित तरुणाचे म्हणणे आहे की, त्याने सार्वजनिक जागेवर मंदिर बांधले होते. मात्र काही लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याने त्यांनी हिंदू मंदिर बंद केले आणि या मनस्तापातूनच त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला.


या थरारक घटनेमुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ प्रचंड खळबळ उडाली होती. महसूल व पोलिस प्रशासनाच्या दक्षतेमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या प्रकारामुळे तालुक्यात धार्मिक तणावाचे सावट जाणवू लागले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)