वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाने सांगली जिल्ह्यातील ग्रंथालयांमध्ये नववर्षाचे स्वागत!

Admin
By -
0

वाचनाने जीवनाकडे पाहण्याच्या नवदृष्टीचा विकास - जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर

वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाने जिल्ह्यातील ग्रंथालयांमध्ये नववर्षाचे स्वागत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व जिल्ह्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा : वाचन पंधरवडा’ हा उपक्रम कार्यक्रम राबवून करणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सांगली या कार्यालयामध्ये प्रेरणादायी व विद्यार्थांची जिज्ञासा वाढविणाऱ्या ग्रंथांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी किरण बोरवडेकर म्हणाले, ध्येय साध्य करावयाचे असल्यास प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवायला हवे. विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. अधिकतम वेळ पुस्तकांच्या सान्निध्यात व्यतित केला पाहिजे. अभ्यासक्रमाव्यतिरीक्त साहित्याचे वाचन आवर्जून केले पाहिजे. त्यातून जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी मिळते. वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचे भरणपोषण व सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचन पंधरवड्यांतर्गत साजरा होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी प्रास्ताविकामध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचा हेतू विषद केला. या उपक्रमांतर्गत आयोजित ग्रंथप्रदर्शन 15 जानेवारीपर्यंत विद्यार्थी व नागरिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत दि. 1 ते 15 जानेवारी या कालावधीत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचक व लेखक संवाद, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ग्रंथालयास भेट इत्यादी कार्यक्रम साजरे करुन नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे सांगली जिल्ह्यातील 328 शासनमान्य ग्रंथालयांना सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच वाचन पंधरवड्यात विद्यार्थ्यांनी आवडीच्या पुस्तकाचे वाचन करुन त्यावर 500 शब्दांचा परीक्षणात्मक निबंध किंवा 5 मिनिटाचे कथन करावे. त्यातील प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व पुस्तक भेट देवून गौरवण्यात येणार आहे. त्यामुळे पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या उपक्रमांतर्गत जिल्हा ग्रंथालय कार्यालयामध्ये ‘शांतता सांगलीकर वाचत आहेत’ हा एक तासाचा सामूहिक वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. विजय भडके यांनी यांनी आभार मानले. या कार्यक्रमास स्पर्धा परीक्षार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)